पिंपरीतील भीमसृष्टीचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्‌घाटन

124

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – जाती, धर्मापेक्षा आपला देश मोठा आहे. आपण सगळे भारतीय असून आपली संस्कृती एकच आहे. त्यामुळे जातीव्यवस्था, अस्पृश्यता, दलितांवरील अन्याय या विचारांना मूठमाती द्या, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवार) येथे केले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीमसृष्टीचे उद्‌घाटन आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.                                                                                                                                    यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, डॉ. राहुल बोध्दे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडेगिरी, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका सुलक्षणा धर- शिलवंत, शर्मिला बाबर, राजेश पिल्ले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. जाती- जाती, धर्मां-धर्मांमध्ये तेढ निर्माण केले जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी समाजात शिक्षण, प्रचार, प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्व जाती –धर्मांच्या लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कायद्याने प्रत्येकाला धर्मस्वातंत्र आहे. मात्र, बळजबरीने धर्मांतर करण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. भीमसृष्टीत मनुस्मती जाळल्याचे म्युरल्स लावण्याच्या सुचना आठवले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना यावेळी केली .

प्रास्ताविक महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. तर आभार सह आयुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.