पिंपरीतील जय हिंद शाळेसमोर पालकांचे उपोषण; शाळेने चक्क ज्युनियर केजीतील विद्यार्थ्याला केले नापास

2739

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी कॅम्पमधील जय हिंद शाळेने चक्क ज्युनियर केजीतील एका विद्यार्थ्याला नापास करून त्याचा शाळेचा दाखला काढून नेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापासून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळ आणि पोलिस आयुक्तांच्याकडे दाद मागितली. परंतु, कोणाकडूनही मदत होत नसल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत शाळेसमोरच शुक्रवारपासून (दि. ७) उपोषण सुरू केले आहे.

पिंपरीत राहणाऱ्या राजेश रोचीरमानी यांचा मुलगा जय हिंद शाळेत ज्युनियर केजीत शिकत आहे. शाळेने या विद्यार्थ्याला नापास केले आहे. तसेच त्याच्या शाळेचा दाखला काढून घ्यावा, यासाठी मुख्याध्यापिका व्ही. राजमाता राजेश रोचीरमानी यांच्यावर दबाव आणत आहेत. या दबावाला न जुगारता रोचीरमानी यांनी आपल्या मुलाचा शाळेतून दाखला काढून घेतला नाही. त्यामुळे मुख्याध्यापिका त्यांच्या मुलाला शाळेत येऊ देत नसल्याचे रोचीरमानी यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी रोचीरमानी यांनी केंद्रीय मंत्रीप्रकाश जावडेकर, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापासून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळ, पिंपरी पोलिस ठाणे तसेच पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. जय हिंद शाळेकडून झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठवला. परंतु, त्याची कोणीच दखल घेत नसल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत शाळेच्यासमोरच उपोषणाला सुरूवात केली आहे. आपली पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत ते शुक्रवारी उपोषणाला बसले आहेत.