पिंपरीच्या महापौरपदासाठी भाजपकडून राहुल जाधव, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांचा अर्ज दाखल

2360

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी कोणाची निवड केली जाणार याबाबत निर्माण झालेली प्रचंड उत्सुकता अखेर संपली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महापौरपदावर भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक राहुल जाधव यांना, तर उपमहापौरपदावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सचिन चिंचवडे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राहुल जाधव यांनी महापौरपदासाठी, तर सचिन चिंचवडे यांनी उपमहापौरदासाठी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे मंगळवारी (दि. ३१) उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे जाधव आणि चिंचवडे या दोघांचीही निवड निश्चित आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ७७ जागांवर विजय मिळवत महापालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तसेच ५ अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपकडे ८३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्याच्या बळावर महापालिकेत भाजपला प्रथमच सत्ता प्राप्त करता आली आहे. प्रथमच सत्ताधारी बनलेल्या भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान चऱ्होली भागातील नगरसेवक नितीन काळजे यांना मिळाला. तसेच निगडी, प्राधिकरणसारख्या उच्चभ्रू परिसरातून निवडून आलेल्या शैलजा मोरे यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात आली. या दोघांनाही सव्वा वर्षासाठी हे पद देण्याचे पक्षाचे धोरण निश्चित झाले होते.

त्यानुसार गेल्या आठवड्यात काळजे आणि मोरे या दोघांनीही आपापल्या पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर महापौरपदी दुसऱ्या कोणत्या नगरसेवकाला संधी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव आहे. या राखीव जागेवर पहिल्या वेळी कुणबी ओबीसी असलेल्या नितीन काळजे यांच्या निवडीमुळे मूळ ओबीसी नाराज झाले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजप दुसऱ्यांदा महापौरपदावर संधी देताना कुणबी ओबीसी की मूळ ओबीसींना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पक्षाने ही कोंडी फोडत महापौरपदावर मूळ ओबीसींना संधी देण्याचा निर्णय घेत राजकीय संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपने महापौरपदावर मूळ ओबीसी असलेले भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक राहुल जाधव यांना, तर उपमहापौरपदावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक सचिन चिंचवडे यांना संधी दिली आहे. राहुल जाधव हे प्रभाग क्रमांक २, चिखली-जाधववाडी-मोशी प्रभागातून, तर सचिन चिंचवडे हे प्रभाग क्रमांक १७, चिंचवडेनगर-वाल्हेकरवाडी-बिजलीनगर-भोईरनगर प्रभागातून निवडून आले आहेत. जाधव आणि चिंचवडे या दोघांनीही महापौर आणि उपमहापौरपदासाठी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या दोघांचीही निवड निश्चित आहे.

येत्या शनिवारी (४ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली जाईल. पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत महापौर आणि उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा होईल.