पिंपरीचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा; आता महापालिकेत नवा गडी नवं राज्य

800

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. २३) पिंपरी-चिंचवडचा दौरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या राजकारणात वेगवान हालचाली झाल्या. महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे या दोघांनाही पक्षाने सव्वा वर्षांची मुदत संपल्यामुळे राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार काळजे आणि मोरे दोघांनीही मंगळवारी (दि. २४) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महापालिकेत नवा गडी नवा राज्य येणार आहे. प्रशासनाने नवीन महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील दोन आठवड्यात शहराला नवीन महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तांतर घडले. राष्ट्रवादीची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन भाजपने प्रथमच महापालिका काबिज केली. राष्ट्रवादीचे सर्वाधिक राजकीय वजनदार नेते अजितदादा पवार यांना धूळ चारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना सोबत घेऊन महापालिका ताब्यात घेतली. महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेतेसह सर्वच महत्त्वाच्या पदांवर भाजपच्याच नगरसेवकांची वर्णी लागली.

महापौरपद ओबीसीसाठी राखीव होते. त्यानुसार या पदावर भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक नितीन काळजे यांची वर्णी लावण्यात आली. उपमहापौरपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शैलजा मोरे यांना संधी मिळाली. तसेच सत्तारूढ पक्षनेतेपद भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच एकनाथ पवार यांना देण्यात आले. ही पदे देताना प्रत्येकाला सव्वा वर्षांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत १५ जून रोजी संपल्यामुळे महापौर, उपमहापौर बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु, विधानसभा अधिवेशन अन्य राजकीय व्यस्ततेमुळे महापालिकेतील पदाधिकारी बदल लांबणीवर पडले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. २३) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते चिंचवडगावातील क्रांतीकारक चापेकर स्मारक समितीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या नियोजित इमारतीचे भूमीपूजन झाले. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत राजकीय गुफ्तगू केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील पदाधिकारी बदलाला ग्रीन सिग्नल दिला. पक्षाने महापौर आणि उपमहापौरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि. २४) आपल्या पदाचा राजीनामा दिला. या दोघांनीही आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. या दोघांच्याही राजीनाम्यामुळे महापालिकेत आता नवा गडी नवा राज्य येणार आहे. नवीन महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी प्रशासनाने प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे.