पावसाळी अधिवेशनात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा

62

नागपूर, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने विधान भवनावर संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विदर्भातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करून ईव्हीएम व मनुस्मृतीची होळी करण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या नियोजनासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार संविधान बदलण्याच्या प्रयत्नात असून सर्वच समाजघटक देशात असुरक्षित आहेत. त्यामुळे देशात अघोषित आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली  आहे. त्यामुळेच हा मोर्चा काढला जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्यांने सांगितले.

देशात निवडणुकांसाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा पुन्हा वापर सुरू करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे. या मोर्चात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी सहभागी होणार आहेत.