पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जाईल- मुख्यमंत्री

61

नागपूर, दि. ९ (पीसीबी) – पावसामुळे संपूर्ण नागपूर जलमय झाले होते. एकूणच पावसाची परिस्थिती पाहता ६ जुलैला जून-जुलैच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडला होता. त्याचप्रमाणे नागपुरात मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पाणी तुंबले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले. तसेच याप्रकरणी चौकशी होऊन जे या प्रकाराला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली. राष्ट्रवादी काँगेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांची जाहीर माफीची मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देताना हे सांगितले. तसेच पावसामुळे ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

साधारणपणे १२५ मिमी नागपूरची ड्रेनेजची क्षमता आहे. पण केवळ सहा तासांत २८२ मिमी पाऊस पडला. इतक्या पाण्याचा निचरा करण्याची कोठेही क्षमता नाही. त्यामुळे नागपूर जलमय झाले होते. मुंबईतही ज्यावेळी समुद्राला भरती येते. त्यावेळी पाण्याचा निचरा करणे कठीण जाते. आता तिथेही पंप वाढवले आहेत. त्यामुळे वेगाने पाण्याचा निचरा होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानभवनात सर्व व्यवस्था करणे गरजेचे होते, हे मान्य करत पाणी शिरल्यामुळे वीज पुरवठा बंद करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठा बंद केला नसता तर शॉर्टसर्किटची शक्यता होती. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाईल. जाणीवपूर्वक कोणी केले असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.