पावसाची २२ ऑगस्टपर्यंत हुलकावणी; सप्टेंबरमध्ये सक्रीय होण्याची शक्यता

180

मुंबई, दि. ९ (पीसीबी) –  राज्यात जूनच्या मध्यानंतर चांगली सुरुवात केल्यानंतर जुलैपासून नैऋत्य मान्सूनने दडी मारली आहे.  जुलैच्या तिसऱ्या  आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. २२ ऑगस्टपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गेल्या वर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये मान्सूनने जवळपास ५५ दिवस विश्रांती घेतली होती. यंदाही अशीच परिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता अभ्यासकांनी  वर्तवली  आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने मोठा  फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे  परतीच्या पावसावरच सर्वकाही अवलंबून असेल.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) साप्ताहिक अहवालानुसार, १५ ऑगस्टपर्यंत नैऋत्य मान्सून देशाच्या उत्तर भागात जास्त सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे सरकल्याने  कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भारतात जास्त प्रमाणात निर्माण होईल. त्यामुळे या काळात उत्तरेकडील राज्यांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. दक्षिण आणि मध्य भारतात मान्सून सक्रियतेसाठी अनुकूल स्थिती नाही, त्यामुळे  पावसाने दडी मारली  आहे.

राज्यात गतवर्षी जुलै -ऑगस्टमध्ये जवळपास ५५ दिवसांचा खंड पडला होता. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरमधील पावसाने तूट काही प्रमाणात भरून काढली होती. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला आतापर्यंत सप्टेंबरमधील पावसाने चांगली साथ दिल्याचे आकडेवारी दिसून येते. यंदाही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.  त्यामुळे सप्टेंबरमधील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.