पालघरमधल्या आदिवासी मुलाचा पराक्रम; सर केले जगातील सर्वोच्च शिखर

0
701

पालघर, दि. ५ (पीसीबी) – पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या एका आदिवासी मुलाने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर करुन दाखवण्याचा पराक्रम केला आहे. केतन जाधव असे या मुलाचे नाव असून तो वाडा तालुक्यातील माधवराव काणे आश्रमशाळेत ११ व्या इयत्तेत शिकत आहे. २३ मे रोजी पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी केतन माऊंट एव्हरेस्टवर पोहोचला.

एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शौर्य-२ ही मोहीम आखली होती. या मोहिमेसाठी आदिवासी प्रकल्प विभागामार्फत वेगवेगळया जिल्ह्यातील ११ मुलांची निवड करण्यात आली होती. या अकरा मुलांमध्ये केतन जाधवही होता. केतनला एव्हरेस्ट मोहिमेसाठी परवानगी देण्यास त्याचे कुटुंबिय तयार नव्हते.

पण केतनच्या मित्रांनी समजावल्यानंतर कुटुंबियांनी त्याला परवानगी दिली. केतनने सुद्धा कुटुंबियांचा विश्वास सार्थ ठरवत जगातील सर्वोच्च शिखर सर केले. मोहिम यशस्वी करुन परतलेल्या केतनचे गावात जोरदार स्वागत करण्यात आले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करण्याची केतन जाधवची इच्छा आहे.

यावर्षी माऊंट एव्हरेस्टवर मोठया प्रमाणावर गर्दी झाल्याने कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजन संपल्यामुळे अनेक गिर्यारोहकांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये भारतामधीलही काही गिर्यारोहक आहेत.