पालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ

71

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – स्पर्धात्मक युगात वाढते गृहकलह ही अत्यंत चिंतेची बाब असून मुलांवर लहान वयातच चांगले संस्कार होण्यासाठी तसेच राष्ट्राची भावी पिढी सक्षम आणि सुसंस्कृत घडवण्यासाठी पालकांनी घरात होणारे गृहकलह टाळावेत, असे अवाहन व्याख्याते निलेश मरळ यांनी केले.

त्रिवेणीनगर येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात पालकांसाठी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक एकनाथ आमले, मनिषा जाधव, अहिरराव, नारखडे सर आदी उपस्थित होते.

निलेश मरळ म्हणाले, “विद्यार्थी उद्याच्या राष्ट्राची खरी संपत्ती आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करून शालेय शिक्षणाबरोबरच अंगभूत कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांशी वागताना त्यांना समजून घेऊन संयम दाखवणे गरजेचे आहे. एकमेकांमधील गृहकलह टाळून मुलांसमोर एक आदर्श मातापित्याची भूमिका बजावणे गरजेचे आहे. विद्यार्थी हीच उद्याच्या प्रगत राष्ट्राची खरी संपत्ती आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे.”