पार्थ पवार पिंपरी चिंचवडचा कारभारी होणार का ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

70

मा. श्री. पार्थदादा अजितदादा पवार तूर्तास ही एक ओळख पुरेशी आहे. विदेशात व्यवस्थापन शास्त्र शिकलेले. बारामतीकर शरदराव पवार यांच्या घराण्यातील कुलदीपक म्हणा की वारस म्हणा. साहेबांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचे जेष्ठ चिरंजीव. राष्ट्राच्या राजकारणात जसा `गांधी` हा एक ब्रँन्ड तसा राज्याच्या राजकारणातील बारामतीकर `पवार` हासुध्दा दुसरा ब्रँन्ड. पवार घराण्यातील खुद्द साहेबांच्या पाठोपाठ, उपमुख्यमंत्री अजितदादा, खासदार सुप्रियाताई सुळे, आता आमदार रोहितदादा हे या घराण्यातून पुढे आलेले मास लिडर. आता कुटुंबातील पार्थदादा ला स्वतःचे बस्तान बसवायचे आहे. घराण्याचे मूळ म्हणजे साहेबांचे वडिल गोविंदराव पवार आणि जुन्या काळातील पुणे लोकल बोर्डाच्या सदस्या शारदाबाई पवार. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा होती. मोठे साहेब त्याच तालमीत घडल्याने समाजवादी, मात्र पुढच्या पिढीत समाजवाद पातळ झाला, विरघळून गेला. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर घराणेशाहिची टीका करता करता आता पवार यांचीही घराणेशाहीच सुरू झाली. अंतिम टप्प्यात आपल्यावरही घराणेशाहिचाच शिक्का बसेल म्हणून मोठे साहेब पार्थदादाला राजकारणात नको, असे अगदी सुरवातीपासून म्हणत आले. त्यामुळे पार्थच्या राजकारणाचा ओनामाच नकार घंटेने झाला. घरची लढाई सांभळण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थला संधी दिली होती, पण व्हायचे तेच झाले. पार्थदादाचा दारूण पराभव झाला. पवार घऱाण्याने हा पहिला पराभव पाहिला. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आता पार्थ पुन्हा नव्या दमाने जिद्दीने रिंगणात उतरला आहे. पिंपरी चिंचवडकरांना लोकसभेला प्रथमच नाकारलेला हा पवार ब्रँन्डचा नेता आता या शहराचा कारभारी बनू पाहतो आहे. तो चालणार का, त्याला साथ मिळणार की मावळ पराभवाचीच पुनरुक्ती होणार. शहराच्या गाव चावडीवर सद्या या विषयावर मंथन सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मायक्रो प्लॅनिंग –
पिंपरी चिंचवड हे २५-३० वर्षे पवार यांच्या हातातले शहर. १९९३ मध्ये साहेबांच्या नंतर दादा या शहराचे पालक झाले. फेब्रुवारी २०१७ ला इथे इतिहास घडला. पूर्वेचा सूर्य थेट पश्चिमेला उगवला आणि शहरावर भाजपाचा झेंडा फडकला. शहराच्या राजकारणावर पक्की मांड असलेल्या अजितदादा पवार यांचे मांडलिकत्व त्यांच्याच शागिर्दांनी झुगारले. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी भाजपाशी घरोबा केल्यानेच इथे परिवर्तन झाले. आता त्याच घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचा दादांचा यत्न आहे. आता ती जबाबदारी पार्थवर सोपविली आहे. पार्थला शहराचा कारभार हातात घ्यायचाय. त्यासाठी पार्थने आता दिवसरात्र एक करून मेहनत सुरू केलीय. अगदी सुमडीत काम चाललंय, जवळपास तळ ठोकून आहे. ताथवडेच्या एका हॉटेलात बसून तो सुत्रे हालवतो. महापालिका निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये आहेत. त्याची तयारी आतापासून सुरू केली. वार्ड रचना कशी करायची, कोणता भाग कुठे जोडायचा, कोणाला बरोबर घ्यायचे, कोणाला टाळायचे याचे नियोजन झाले. येणाऱ्या १४ महिन्यांचा आराखडा तयार आहे. अगदी सुक्ष्म म्हणजे मायक्रो प्लॅनिंग आहे. सर्वेक्षणासाठी काही संस्था नेमल्या आणि त्यांचेही काम सुरू झाले. पीआर एजन्सीचे काम एकाकडे सोपविले. काळ्या काचाच्या वाहनातून पार्थ आणि राष्ट्रवादीचे त्या त्या वार्डचे आजी-माजी नगरसेवक यांचे पाहणी दौरे अर्धे पूर्ण झालेत. सांगवी, नवी सांगवी, नवी सांगवी, वाकड, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी, पिंपरीगाव, चिंचवड, ताथवडे, पुनावळे, आकुर्डी, निगडी, प्राधिकरणातील पाहणी, चर्चा, गाठभेटी झाल्यासुध्दा. प्रसिध्दीमाध्यमांना याची कानान खबर नाही आणि त्यांच्या पर्यंत काही पोहचू नये याचीही खबरदारी घेतली जाते. सोशल मीडिया हाताळण्यात पार्थ आणि त्याचा भाऊ जय तरबेज आहेत. गेल्यावेळी (सन २०१७) राज्यात भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. त्यामुळे भाजपा सत्तेवर येण्यासाठी आवश्यक अशी वार्ड रचना कऱण्याचे काम एका मास्टर माईंड व्यक्तीकडे सोपविण्यात आले होते. आता राज्यात राष्ट्रवादीचे सरकार असल्याने पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेचा सोपना गाठण्यासाठी आवश्यक अशी वार्ड रचना करण्याचे नियोजन पार्थकडे आहे.

पार्थची टीम वेगळीच, गावकीला पूर्ण फाटा ? –
पिंपरी चिंचवडचे राजकारण म्हणजे गावकी भावकी. गेले ५० वर्षांचे हे समिकरण. गाववाला आणि बाहेरचा हा इथल्या राजकारणाचा पाया. आता ९५ टक्के बाहेरचा वर्ग आहे. काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीनेही तोच धागा पकडून खुंटा बळकट केला होता. भाजपाने तेच ओळखले. गावकी फोडली आणि वाण्याबामनाच्या भाजपामध्ये पवित्र करून घेतली. मतदार भले बाहेरचा असू देत एकजात सर्व पक्षांचे नेते सारे गाववालेच आहेत. पार्थदादाला ही गोम समजली. मावळ लोकसभा निवडणुकीत आपले म्हणविणाऱ्या गावकीनेच दगाफटका केला. त्याची सल त्याच्या मनात आहे. त्यामुळे आता एक वेगळा आणि धाडशी प्रयोग करायची पार्थची खेळी दिसते. सोयरेधायरे इथल्या राजकारणात बाहेरच्या माणसाला संधीच मिळून देत नाहीत. सर्व पात्रता असूनही अनेक रथीमहारथी या शहरात राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर आहेत. त्यांना रिंगणात आणायचे आणि मोठे करायचे. वर्षोन वर्षे तेच ते चेहरे आहेत त्यांना बाजुला ठेवायचे आणि नव्या दमाच्या युवकांना पुढे आणायचे पार्थचे सूत्र दिसते. त्याला पूर्ण नवीनच टीम करायची आहे, जी ना साहेबांची ना दादांची असेल. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी अत्यंत अभ्यासू, कर्तृत्ववान, होतकरू, धडपड्या अशा सुनिल गव्हाणे याची नियुक्ती पार्थदादा पवार यांच्या शिफारशीनुसार झाली. अशा प्रकारे विविध क्षेत्रातील तरुण, तरुणींचा संच उभा करायचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. भाजपाला याचा थांग पत्ता नाही. राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेले आणि नगरसेवक झाले अशा किमान ५० स्वयंभू नगरसेवकांच्या घरवापसीसाठी एक कुजबूज यंत्रणा कार्यरत आहे. लोकसभा निवढणुकीला पहिल्याच भाषणबाजीत पार्थने मार खाल्ला होता, आता त्याचीही कमी भरून काढण्यासाठी पर्यायांचे शोध सुरू आहे. अजित पवार यांनी त्यांच्या काळात इथे कोणते प्रकल्प राबविले, त्यातले किती पूर्ण झाले, किती बाकी आहे, कोणते रखडले यांचेही सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील अनधिकत बांधकामे, शास्तीकर या कळीच्या मुद्यांवर भाजपाने नागरिकांची फसवणूक केली होती, आता तेच काम १०० टक्के पूर्ण करून पाच लाख मतांचा गठ्ठा निश्चित करायचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी ठरवले आहे. भाजपान केलेल्या चुका, भ्रष्टाचार याचीही जंत्री राष्ट्रवादीकडे तयार आहे. अशा प्रकारे साम, दाम, दंड, भेद हा पवार ब्रँन्डचा फॉर्मुला वापरून गड जिंकायची व्युहरचना झाली आहे. महापालिकेला आता आरपार की लढाई असेल. पवार यांच्याच भाषेत सांगायचे तर, तवा तापला आहे, आता भाकरी पलटली नाही तर करपेल. पार्थ पवारसाठी आता ही सत्वपरिक्षा आहे. अजित पवार यांच्यासाठीही ही निकराची लढाई असणार आहे. त्यात उडाला तर कावळा नाहीतर बेडूक.

WhatsAppShare