पार्थ पवारला निवडून द्यावे की नाही; राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम?, प्रचारयंत्रणेत ढिसाळपणा

720

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – मावळ मतदारसंघात अजितदादांनी विजयाच्या खात्रीने स्वतःच्या पुत्राला निवडणूक रिंगणात उतरवले असले तरी प्रत्यक्षात आता वेगळेच चित्र उभे राहिले आहे. राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेत ढिसाळपणा दिसून येत आहे. नियोजनाअभावी कोणाचा कोणाला पायपोस राहिला नसून, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. आताच ही परिस्थिती असेल, तर उद्या पार्थ पवार निवडून आल्यानंतर आपली काय अवस्था होईल या विचाराने नगरसेवक व पदाधिकारी चिंतेत आहेत. परिणामी हे सर्वजण पक्षाचा प्रचार मनापासून करतात की नाही याबाबत शंका उपस्थित व्हावी, अशी स्थिती आहे. पार्थ पवार हे बाहेरचे असल्याने त्यांना निवडून द्यावे की नाही याबाबतही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे सर्वजण शेवटच्या क्षणी आपले “काम दाखवतील”, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अजितदादांनी आपले पुत्र पार्थ पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. विविध माध्यमांना मुलाखती देताना अजितदादा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसारच पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात पार्थ पवार यांच्या उमेदवारीला पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोधच होता, हे वास्तव आहे. पवार घराण्यातील सदस्यांनाच खासदार, आमदार करायचे असेल तर आम्ही कायम सतरंज्या उचलायच्या काय, अशी भावना पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याकडे दुर्लक्ष करून अजितदादांनी स्वतःच्या पुत्रालाच उमेदवारी देऊन आपलेच खरे करून दाखवले.

पार्थ पवार यांची लादलेली उमेदवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गपगुमाने सहन केली. उमेदवारी दिल्यानंतर तरी त्यांना विश्वासात घेतले जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना फाट्यावर मारून पक्षाची प्रचार यंत्रणा सुरू आहे. त्यात नियोजन तर सोडाच कोण काय करतोय, याचाच थांगपत्ता लागत नसल्याचे चित्र आहे. आताच ही परिस्थिती असेल तर पार्थ पवार हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपली काय अवस्था होईल, या चिंतेने राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना ग्रासले आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. परिणामी हे सर्वजण पक्षाचा प्रचार मनापासून करतात की नाही याबाबत शंका उपस्थित व्हावी, अशी स्थिती आहे. पार्थ पवार हे बाहेरचे असल्याने त्यांना निवडून द्यावे की नाही याबाबतही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम असल्याचे चित्र आहे. पार्थ पवार यांच्या प्रचाराची यंत्रणा सांभाळणारे काही जण पार्थ निवडून आल्यासारखेच वागताना दिसत आहेत. स्वपक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळे हे सर्वजण निवडणुकीत शेवटच्या क्षणी आपले “काम दाखवतील”, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.