पाण्याने भरलेल्या पातेल्यात पडून दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

329

धुळे, दि. १३ (पीसीबी) –  खेळता-खेळता पाण्याने भरलेल्या मोठ्या पातेल्यात बुडून दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१२) दुपारी चारच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील कापडणे तालुक्यात असलेल्या उडाणे गावात घडली.

निकिता (३ वर्षे) व ज्ञानेश्वरी पाटील (दीड वर्षे) असे मृत बहिणींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चारच्या सुमारास मयत निकिता आणि तिची बहिण ज्ञानेश्वरी या दोघी घरात खेळत होत्या. तब्येत बरी नसल्याने त्यांची आई राणीबाई या घरच्या पुढच्या खोलीत आराम करत होत्या. तसेच आजीही घरच्या पुढच्या भागात घरकामात व्यग्र होत्या. त्या वेळी निकिता व ज्ञानेश्वरी या दोन्ही बहिणी खेळता-खेळता बाथरूमकडे गेल्या. खेळताना त्या अचानक पाण्याने भरलेल्या मोठ्या पातेल्यात पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मुलींचे वडील भाऊसाहेब अण्णा पाटील हे शेतीकाम व खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्यामुळे तेही बाहेरच होते. घरात मुलींची चाहूल लागत नसल्याचे लक्षात आल्यावर राणीबाईंना जाग आली. त्यांनी घरात जाऊन बघितल्यानंतर दोन्ही मुली पातेल्यात पडल्याचे दिसून आले. या घटनेमुळे उडाणे गावावर शोककळा पसरली आहे.