पाणी मारताना बांधकाम साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू

335

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या शेजारी सुरु असलेल्या महिंद्रा लाईफ स्पेसेस या बांधकाम साईटवर पाणी मारण्याचे काम करत असलेल्या एका कामगाराचा बांधकामावरून पडून मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली आहे.

सतीश बंशीराम आडे (वय २४, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अजय बंशीराम आडे (वय २४, रा. जाधववाडी, चिखली) यांनी शनिवारी (दि. ४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज गवारे (वय ३८, रा. पिंपरी), नागेश (वय ३०, रा. पिंपरी), जी एम सर्व्हिसेस कंपनीचे या कामाशी संबंधित सर्व व्यक्ती आणि महिंद्रा लाईफ स्पेसेसचे या कामाशी संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ मयत सतीश हा महिंद्रा लाईफ स्पेसेस या बांधकाम साईटवर पाणी मारण्याचे काम करत होता. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पाणी मारत असताना सतीश बांधकामावरून खाली पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींनी सतीश याला सुरक्षेची कोणतीही साधने पुरवली नाहीत. या निष्काळजीपणामुळे सतीशचा मृत्यू झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.