पाणी भरण्यासाठी मोटारीची वायर मागितल्याने दिराने केली वायरनेच मारहाण

24

भोसरी, दि. २० (पीसीबी) -टेरेसवरील टाकीत पाणी सोडण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरु करण्यासाठी वायर मागणा-या भावाच्या पत्नीला मोठ्या दिराने इलेक्ट्रिक वायरने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १९) रात्री साडेसात वाजता चक्रपाणी वसाहत, भोसरी येते घडली.

सुभद्रा पोपट कदम (वय ५५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विलास कोंडीबा कदम (वय ६८, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच इमारतीमध्ये राहतात. त्यांच्या घराच्या टेरेसवर सामाईक पाण्याची टाकी आहे. त्या टाकीमधील पाणी संपले असल्याने शनिवारी रात्री फिर्यादी तळमजल्यावरील अंडरग्राउंड टाकीतील पाणी इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने वरच्या टाकीत सोडण्यासाठी गेल्या. त्यावेळी इलेक्ट्रिक मोटरची वायर काढलेली असल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या मोठ्या दिराकडे वायर मागितली. त्यावरून आरोपी दिराने त्यांना ‘थांब तुला वायर देतो’ असे म्हणून इलेक्ट्रिक वायरने मारहाण केली. तसेच ‘तू पाणी कशी भरते बघतोच’ असे म्हणून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare