पाणीपट्टी वाढीवरून पिंपरी महापालिकेच्या महासभेत विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ

416

आगामी आर्थिक वर्षापासून सहा हजार लिटरपर्यंत पाण्याचा वापर मोफत आणि त्यापुढे पाण्याचा वापर केल्यास पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी (दि. २८) विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी महापौरांसमोरील मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. महापौर नितीन काळजे यांनी या विषयावर चर्चेची तयारी दाखविली असतानाही विरोधकांनी सभात्याग केला. पंधरा वर्षात सत्ता असतानाही वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था न करणाऱ्या राष्ट्रवादीचा हा ढोंगीपणा असल्याची टिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सभेनंतर केला. सर्वसाधारण सभेत गोंधळ घालायचा हा राष्ट्रवादीचा पूर्वनियोजित कट होता, असा आरोपही त्यांनी केला.

महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपट्टी दरात वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. स्थायी समितीने त्यात बदल करत नागरिकांना सहा हजार लिटरपर्यंतचे पाणी मोफत आणि त्यापुढे पाण्याचा वापर झाल्यास पाणीपट्टी दरात वाढीचे टप्पे निश्चित करून ते सर्वसाधारण सभेकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला होता. त्यानुसार बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर तब्बल दोन तास चर्चा झाली. सत्ताधारी भाजपने प्रस्तावाला उपसूचना देऊन सहा हजार लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करणाऱ्या नळजोडधारकांना आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत कपात केली. राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणीपट्टी वाढीला विरोध असल्याचे सांगितले. हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी जोरदार मागणीही नगरसेवकांनी केली.

परंतु, भाजपच्या नगरसेविका सुवर्णा बुर्डे या प्रस्तावावर बोलत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी वाद घातला. त्यावरून सभागृहात गोंधळाला सुरूवात झाली. महापौर काळजे यांनी दोन्ही नगरसेविकांना सूचना देऊन वाद न घालण्यास सांगितले. परंतु, त्यांच्यातील वाद सुरूच राहिल्यामुळे महापौर नितीन काळजे यांनी या प्रस्तावाला उपसूचनेसह मंजुरी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी महापौरांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. महापौर काळजे यांनी सर्व नगरसेवकांना जागेवर जाऊन बसण्याची वारंवार विनंती करूनही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ऐकले नाही. त्यामुळे महापौर काळजे यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली.

सभा तहकुबीनंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू होती. दहा मिनिटानंतर सभेला सुरूवात होताच राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी पुन्हा गोंधळाला सुरूवात केली. महापौर काळजे यांनी वारंवार विनंती करूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या प्रस्तावावर विरोधी पक्षाच्या नगरसेकांचा विरोध नोंदवून घेत त्यावर चर्चा करण्याची महापौर काळजे यांनी तयारी दर्शविली. परंतु, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी महापौरांचे ऐकले नाही. या गोंधळातच महापौर काळजे यांनी सभेच्या कामकाजाला सुरूवात केली. त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी विषयपत्र फाडून सभेत भिरकावत सभात्याग केला आणि सत्ताधारी भाजपने सभेचे कामकाज संपविले.

सभेनंतर महापौर काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ज्येष्ठ नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेतली.

एकनाथ पवार म्हणाले, “सध्या प्रति नळजोडाला महिन्याला ५६ रुपये २५ पैसे पाणीबिल येते. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार आता केवळ पाणीबिलात केवळ ९ रुपये वाढ होणार आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपने दिलेली उपसूचना ऐकलीच नाही. तसेच राष्ट्रवादीने सभेत गोंधळ घालण्याचा पूर्वनियोजित कट रचला होता. त्यानुसार त्यांनी सभेत गोंधळ घातला. १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाढीव पाण्याची व्यवस्था केली नाही. पवना जलवाहिनी प्रकल्प भ्रष्टाचार करण्यासाठी राबविला आणि तो लटकविला. या प्रकल्पासाठी ठेकेदाराला २०० कोटी रुपये आगाऊ दिले. भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याकडे दुर्लक्ष केले. आज तीच राष्ट्रवादी पाण्याच्या मुद्द्यावर ढोंगबाजीचे राजकारण करत आहे. पाण्याचा कमी वापर करणाऱ्या नागरिकाला कोणतीही पाणीपट्टी द्यावी लागणार नाही. परंतु, पाण्याचा जास्त वापर करणाऱ्यांकडून जास्त कर वसुल करण्याच्या उद्देशाने पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. त्यामागे पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”