पाच वर्षामध्ये एकही निवडणूक न लढवणाऱ्या पक्षांची नोंदणी रद्द होणार  

117

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – पाच वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकही निवडणूक न लढवणाऱ्या आणि जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज (सोमवार) येथे दिली.  

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २००४ पासून राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी केली जाते. सध्या ‘राजकीय पक्ष नोंदणी आदेश २००९ अस्तित्वात आहे. अनेक राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, विचारवंतांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने या आदेशात सुधारणा केल्या आहे.

आयोगाच्या २५ जुलै २०१८ च्या सुधारित आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या राजकीय पक्षाने पुढील पाच वर्षात किमान एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कमीत कमी एका जागेवर निवडणूक लढवणे आवश्यक असेल, अन्यथा संबंधित पक्षाची नोंदणी रद्द करण्यात येईल, असे सहारिया यांनी सांगितले.