“पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बरे, कारण….”

24

नवी दिल्ली,दि.१६(पीसीबी) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हणत सरकारला टोला लगावला आहे. “भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे करोना परिस्थिती हाताळली आहे,” असं राहुल यांनी ट्विट केलं आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भा दिला आहे. त्यांनी एक ग्राफ शेअर केला असून त्यामध्ये भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या ग्राफमध्ये करोनाच्या कालावधीमध्ये बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, चीन आणि भूतानच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारताच्या जीडीपीमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. भारताचा जीडीपी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या जीडीपीपेक्षा अधिक प्रमाणात घसरल्याचे दिसत आहे. या ग्राफमध्ये पुढील वर्षी अफगाणिस्तानचा जीडीपी पाच टक्क्यांनी आणि पाकिस्तानचा जीडीपी केवळ ०.४० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरेल असं या आकडेवारीत सांगितलं आहे.

दरम्यान प्रत्येक व्यक्तीच्या मागे जीडीपीच्या प्रमाणात भविष्यात बांग्लादेश लवकरच भारताला मागे टाकणार असल्याचे आयएमएफचा अंदाज आहे. यावरुनच राहुल गांधींनी बुधवारीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘ही द्वेषाने भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची कमाई आहे. बांग्लादेश भारताच्या पुढे जाणार आहे,’ असा टोला राहुल यांनी बुधवारी लगावला होता.

WhatsAppShare