पाकिस्तानी सैन्यावर सतत टीका करणाऱ्या महिला पत्रकाराचे अपहरण

325

लाहोर, दि. ६ (पीसीबी) – पाकिस्तानच्या सैन्यावर सतत टीका करणाऱ्या ५२ वर्षीय महिला पत्रकार गुल बुखारी यांचे अज्ञातांनी मंगळवारी (दि.५) रात्री अपहरण केले होते. सोशल मीडियावर या अपहरणासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला जबाबदार धरण्यात येत होते, त्यानंतर काही तासांतच त्यांची सुखरुप सुटका झाली.

याप्रकरणी गुल बुखारी यांच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुल बुखारी या मंगळवारी रात्री  अकराच्या सुमारास त्यांच्या कार्यक्रमासाठी ‘वक्त टीव्ही’मध्ये जात होत्या. या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी लाहोर कॅंटजवळ अडवली आणि त्यांचे अपहरण केले. दोन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती त्यांच्या गाडी चालकाने कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली. त्यानंतर गुल बुखारी यांचे अपहरण झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि गुप्तचर यंत्रणांनीच त्यांचे अपहरण केल्याचा आरोप सोशल मिडीया युजर्सनी आणि अन्य पकिस्तानी पत्रकारांनी वर्तवला होता. त्यानंतर अपहरणाच्या अवघ्या तीन तासांमध्येच त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र, त्यांचे अपहरण कोणी केले होते याबाबत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, गुल बुखारी या पाकिस्तानी सैन्यावर सातत्याने टीका करत असतात, लष्कराने राजकारणात हस्तक्षेप करण्यासही त्या विरोध करत होत्या. त्यामुळे गुप्तचर विभागानेच त्यांचे अपहरण केल्याचा अंदाज सोशल मीडियावर युजर्सनी आणि अन्य पकिस्तानी पत्रकारांनी वर्तवला होता.