पाकिस्तानात आज पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के

47

इस्लामाबाद, दि. ७ (पीसीबी): पाकिस्तानमधील हरनई भागामध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भूंकपात २० जण ठार झाले आहेत. तर, १५० हून अधिकजण जखमी झाले आहेत. त्याशिवाय अनेक घरांचे नुकसान झाले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इतकी होती. हरनईच्या जवळील जिल्ह्यातही भूंकपामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

‘नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी’ने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रांतीय सरकारचे वरिष्ठ अधिकारी सुहैल अन्वर हाश्मी यांनी वृत्तसंस्था ‘एएफपी’ ला सांगितले की, घराच्या भिंती कोसळल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

हरनई भाग हा बलुचिस्तान प्रांतात आहे. भूंकपानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. क्वेटामधून मदत कार्यासाठी आवश्यक साहित्य पाठवण्यात आले आहे. हरनई येथील भूकंपात जखमी झालेल्या नागरिकांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हरनई येथील रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मोबाइल टॉर्चच्या उजेडात जखमींवर उपचार करण्यात येत आहे.

WhatsAppShare