पाकसोबत बोलीने नव्हे, गोळीने व्यवहार करायला हवा – संजय राऊत  

74

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत तुम्ही काश्मीरविषयी आश्वासन दिले होते. त्यावेळी तुमच्या आश्वासनाला लोकांनी टाळ्याही वाजवल्या होत्या. त्या आश्वासनाचे काय झाले?, भाजपला असा सवाल करून पाकसोबत बोलीने नव्हे तर गोळीने व्यवहार करायला हवा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

‘सीमेवर सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,’ असे चिथावणीखोर विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी पाकिस्तानच्या ५३ व्या संरक्षण दिनाच्या सोहळ्यात केले होते. याला केंद्र सरकारने अजूनही उत्तर दिलेले नाही. यावर शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाना साधला. पाकिस्तानसोबत आता मैत्री करण्यात काही अर्थ नाही. पाकिस्तानला केवळ गोळीची भाषा समजते. त्यामुळे त्यांना याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मोदी सरकारचे पाच पूर्ण व्हायला आले आहेत. मागच्या निवडणुकीत मते मागताना तुम्ही काश्मीरविषयी आश्वासन दिले होते. त्यावेळी तुमच्या आश्वासनाला लोकांनी टाळ्याही वाजवल्या होत्या. त्या आश्वासनाचे काय झाले? असेही संजय राऊत म्हणाले.