पाकप्रेमाचा  इतका उमाळा असेल, तर सिध्दूने  पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना

231

मुंबई, दि. २० (पीसीबी) – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानात गेल्यानंतर लष्करप्रमुखांची गळाभेट घेण्याच्या कृतीवर शिवसेनेने पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू  यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. गेल्या १५ दिवसांत सीमेवर पाकच्या गोळीबारात मेजर कौस्तुभ राणेसह १५ जवान शहीद झाले आहेत. तरी  सिद्धू पाकिस्तानात जाऊन नाचेगिरी करतो, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. सिद्धूला पाकप्रेमाचा एवढाच उमाळा आला असेल, तर त्याने पाकिस्तानातूनच निवडणूक लढवावी, असे शिवसेनेने म्हटले आहे.

आज (सोमवारी) शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून सिद्धूवर बोचऱ्या शब्दांत खरपूस समाचार घेतला आहे. इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्यात सिद्धूने घरचेच लग्नकार्य असावे, अशा थाटात त्या सोहळ्यात मिरवला. पाकिस्तानात जाऊन हे असले उद्योग करण्याची सिद्धूला काय गरज होती? नवज्योतशिवाय इम्रानचा शपथग्रहण सोहळा अडून राहिला असता का?, असा सवाल शिवसेनेने केला आहे. मनात देशभक्तीची ज्योत पेटत असती तर त्याने पाकड्यांच्या प्रदेशात जाऊन तेथील लष्करप्रमुखांना मिठ्या मारण्याचा मूर्खपणा केला नसता, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

सिद्धूला पाकप्रेमाचा एवढाच उमाळा आला असेल तर त्याने पाकिस्तानातूनच निवडणूक लढवावी. सिद्धू आधी भाजपमध्ये होता व नंतर काँग्रेसमध्ये गेला. त्याचा मूळ रक्तगट भाजपचाच आहे. त्यामुळे सिद्धू पाकिस्तानात गेला म्हणून काँग्रेसवर वार करण्यापेक्षा भाजपवाल्यांनी सिद्धू आपल्या पक्षात असताना नेमके काय संस्कार कमी पडले यावर आत्मचिंतन केले पाहिजे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.