पहाटे ३ वाजेपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार ?- चंद्रकांत पाटील

148

कोल्‍हापूर, दि. २५ (पीसीबी) – पहाटे ३ वाजेपर्यंत जागून काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार ?, असा प्रतिसवाल करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाचा केलेला दावा फेटाळून लावला.

भाजपमध्‍ये मुख्‍यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय प्रधानमंत्री मोदी आणि भाजपाध्‍यक्ष अमित शहा घेतील, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, राज्य सरकारमधील  क्रमांक दोनचे नेते चंद्रकांत पाटील यांनी हा दावा खोडून काढला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा निर्णय आता न्यायालयाच्या हातात आहे, जेवढे करणे शक्‍य होते, तेवढे सरकारने केले’, असे विधान मंगळवारी चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या विधानावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, माझ्या या विधानाचा विपर्यास करण्‍यात आला. मराठा समाजाला आरक्षण देणे हे माझे काम नाही, तर बांधिलकी आहे, असे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्‍न पाटील यांनी केला. तरीही कोणाच्‍या भावना दुखावल्‍या असतील, तर मी दिलगिरी व्‍यक्‍त करतो, असे ते म्‍हणाले.