पश्चिम बंगालचे ‘बांगला’ असे नामकरण करण्यास विधानसभेची मंजुरी

86

कोलकाता, दि. २६ (पीसीबी) – पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘बांगला’ असे नामकरण करण्यास राज्याच्या विधानसभेने आज (गुरूवार) मंजुरी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. इंग्रजीतील वर्णमालेनुसार पश्चिम बंगालच नाव सर्वात खाली येते. त्यामुळे वर्णमाला क्रमात राज्याचे नाव वर यावे, यासाठी ममता बॅनर्जी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

विधानसभेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतरही राज्याला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मंजुरीची गरज आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ होणार आहे.

याआधी केंद्र सरकारने २०१६ मध्ये पश्चिम बंगाल सरकारच्या तीन नावांचा प्रस्ताव फेटाळला होता. राज्याचे बंगाली भाषेत ‘बांगला’, इंग्लिश भाषेत ‘बेंगाल’ आणि हिंदी भाषेत ‘बंगाल’ करण्यात यावे, असा प्रस्ताव पश्चिम बंगाल सरकारने दिला होता. परंतु एकाच राज्याचे तीन वेगवेगळ्या भाषेत, तीन वेगवेगळी नावे असू शकत नाहीत, असे सांगून केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळला होता.