पवार यांच्यावर टीका दुर्दैवी – मधुकर पिचड

40

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ढवळून निघालेलं राजकीय वातावरण अद्यापही कायम आहे. पडळकरांच्या विधानावरुन राष्ट्रवादी आक्रमक आहे, तर भाजपा नेते बॅकफूटवर गेले आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच शरद पवारांवरील टीका दुर्दैवी असल्याची खंतही व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच वाद उफाळून आला होता. मी भाजपात असलो तरी अनेक वर्ष शरद पवारांसोबत काम केलं आहे. टीका करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे, असा हल्लाबोल मधुकर पिचड यांनी केला. पिचड यांनी पत्रक काढून गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला. पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली आहे. शरद पवारांवर टीका ही दुर्दैवी आहे, असं मत पिचड यांनी व्यक्त केलं

WhatsAppShare