पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केला – गिरीश बापट

134

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – मावळ लोकसभा निवडणुकीत पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केला आहे, असे सांगून पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी पवार कुटुंबियांवर  हल्ला चढवला.

पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानिमित्त व पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांची खासदारपदी निवड झाल्याबद्द्ल पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बापट बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पवार घराण्याला जो दणका दिला, तो सर्वात महत्वाचा होता.  पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता येईल, असे वाटत होते. पण पिंपरी-चिंचवड  महापालिकेत भाजपची सत्ता येणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मी मी म्हणणारे तोंडात बोट घालून घरी बसले आहेत, असा टोला गिरीष बापट यांनी  पवारांना लगावला.

बापट म्हणाले की, पिंपरी चिंचवड मध्ये मान्यवर खूप आहेत. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. एवढे मान्यवर महाराष्ट्रात नाहीत. पिंपरी-चिंचवडमध्ये वातावरण चांगले आहे, पण ते समजायला मला साडे चार वर्षे लागली, असे ते म्हणाले.