पवना धरणातून १५००  क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग सुरू; नदीच्या पाणीपातळीत वाढ

311

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – मावळ तालुक्यासह पिंपरी- चिंचवड शहराची  जीवनदायिनी असलेले पवना धरण  यंदा लवकरच १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची वर्षभराची पिण्याची पाण्याची चिंता मिटली आहे.दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दोन गेट अर्ध्या फुटाने उचलल्याने १५००  क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पवना नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली असून नदीकाठ्याच्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.    

पवना धरणात मे महिन्याच्या अखेर १८ टक्के पाणी साठा शिल्लक होता.  धरण परिसरात १ जुन पासून २ हजार २५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती शाखा अधिकारी ए.एम.गदवाल यांनी दिली . पवना धरणामध्ये २४१ दशलक्ष घनमीट एवढा उपयुक्त पाणी साठा झाला आहे.

दरवर्षी पवना धरण १५ ऑगस्ट दरम्यान पूर्णक्षमतेने भरते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरूवातीला दमदार पाऊस झाल्याने यंदा १५ दिवसआधी धरण १०० टक्के भरले आहे.  त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला २ हजार ३६२ मिमी पाऊस झाला होता.