पर्रिकरांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी – काँग्रेस

168

पणजी, दि. ३१ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेला गेल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पर्रिकर यांचा वैद्यकीय अहवाल २४ तासांच्या आत जाहीर करण्याच्या मागणीबरोबरच, कॉंग्रेसने पुढील रणनीती ठरवण्यासाठी विधीमंडळ गटाची आज (शुक्रवारी) दुपारी बैठक बोलावून भाजपवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आरोग्याच्या मुद्द्यावरुन पायउतार व्हावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्री होईल या भीतीने दुसरा मुख्यमंत्री नेमला जात नसल्याची टीका करत, काँग्रेसने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी काल पर्रिकर हे वारंवार प्रकृती बिघडल्याने मुंबई-अमेरिका येथे उपचारासाठी जातात. परंतु भजपने अद्यापही त्यांच्याबाबत कोणताही वैद्यकीय अहवाल जाहीर केलेला नाही. ही कृती चुकीची असून पर्रिकर मुंबई आणि अमेरिकेतून किती दिवस प्रशासन चालवणार आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.

सध्या लोकशाहीची विटंबना चालू असून पर्रिकरांनी हट्टीपणा सोडावा आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी, मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढल्याने भाजपने पूर्णवेळ तंदुरुस्त नेता मुख्यमंत्रीपदी नेमावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आज (शुक्रवारी) होणाऱ्या काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत याच विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा असेही काँग्रेसला वाटते.