पराभव दिसत असल्याने भाजपकडून एकत्रित निवडणुकीचे  बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण

136

मुंबई, दि. १४ (पीसीबी) –  भाजपला पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे भाजपकडून एकत्रित निवडणुकीचे  बुजगावणे उभे केले जात आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. निवडणुका जिंकणे हेच उत्साही अमित शहा यांचे एकमेव ध्येय आहे, असा निशाणाही चव्हाण यांनी साधला.

चव्हाण म्हणाले की, अर्थव्यवस्था, कृषी संकट आणि आता रुपयाची घसरण यामुळे निवडणुका जिंकणे भाजपला अवघड झाले आहेत. पराभव समोर दिसत असल्याने एकत्रित निवडणुका हे भाजपने उभे केलेले बुजगावणे आहे, असे ते म्हणाले.

एकत्रित निवडणुका घेतल्या तर पैसे वाचणार नाहीत, उलट जास्त खर्च येणार आहे. देशात एकत्रित निवडणुकांसाठी २३ लाख ईव्हीएम आणि २५ लाख व्हीव्हीपॅट मशीन यांची आवश्यकता लागणार आहे.   त्यांची शेल्फ लाईफ १५ वर्षे म्हणजे ३ निवडणुका इतकी आहे. ४ हजार कोटी किमतीच्या मशिन विकत घ्याव्या लागतील. दुप्पट मशीन लागणार असल्याने पैसे वाचणार नाहीत, तर जास्त पैसा खर्च होणार आहे.  त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात मशीन ठेवणे, ट्रान्सपोर्टेशन यामुळे १० ते १५ हजार कोटींचा अधिक खर्च येणार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.