परळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

42

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  मुंबईच्या परळमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत दोघांचा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी आठच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेल पूर्वमधील हिंदमाता परिसरातील १४  मजली क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २० गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यादरम्यान एका वृद्ध महिलेचा आणि एका पुरुषाचा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाला. हे दोघेही बाराव्या मजल्यावर राहत होते. त्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या इतर लोकांना तातडीने क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. त्यापैकी आठ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. हिंदमाता पोलिस तपास करत आहेत.