परदेशात शिक्षण, नोकरीसाठी जाणाऱ्य़ांसाठी आनंदाची बातमी! आता कोरोना लसीचा दुसरा डोस ‘इतक्या’ दिवसांनी घेता येणार

13

मुंबई, दि.१० (पीसीबी) : देशभर कोरोनाने थैमान घातलं आहे. आता लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरु आहे. दरम्यान, परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, परदेशात उच्च शिक्षण आणि कामासाठी जाणाऱ्य़ा युवा वर्गाला दुसरा डोस 28 दिवसांनंतर घ्यायला केंद्रीय आरोग्य खात्याने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणाऱ्य़ा खेळाडूंना ही सवलत देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने याबाबत गाईडलाईन जारी केली आहे. त्यामुळे देशभरातील हजारो तरुणांना दिलासा मिळाला आहे.

हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरणामुळे कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. त्याचबरोबर आता 18 ते 44 वयोगटातील तरुणांचेही लसीकरण सुरू असून यात परदेशात उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्य़ा तरुणांचाही समावेश आहे. कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी दीड महिन्याचा होता, मात्र काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी म्हणजे जवळजवळ तीन महिन्यांनी घेता येणार असल्याची नवीन गाईडलाईन जारी केली. मात्र यामुळे परदेशात शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्य़ा तरुणांचे नुकसान होत होते. त्या पार्श्वभूमीवर दुसरा डोस 84 दिवसांनी घेण्याच्या नियमात विद्यार्थी आणि नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्य़ा तरुणांना सवलत द्यावी, अशी मागणी देशभरातून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने ही नवीन गाईडलाईन जारी केली आहे. त्या दृष्टीने ‘को-विन अॅप’मध्ये परदेशी जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्य़ा खेळाडूंसाठी वेगळी श्रेणी तयार करून सुधारणा केली जाणार आहे.

WhatsAppShare