परतीच्या प्रवासावरील तुकोबांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये भक्तीभावाने स्वागत

174

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी परतीचा प्रवास सुरू असून, मंगळवारी (दि. ७) दुपारी पिंपरी-चिंचवडमध्ये पालखीचे आगमन झाले. शहरवासीयांनी पालखीचे स्वागत मोठ्या भक्तीभावाने केले. पालखी आज पिंपरीत मुक्काम करून बुधवारी (दि. ८) सकाळी देहूकडे प्रवास करेल.

पंढरपूर ते देहू परतीच्या प्रवासावर असलेली जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पोचली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पिंपरीगावात पालखी मुक्कामी पोचली. तुकोबांच्या पालखीचा परतीचा प्रवास चिंचवडगावातून व्हावा, अशी येथील भाविकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती यंदा पूर्ण झाली असून, तुकोबांची पालखी प्रथमच चिंचवडगावमार्गे प्रवास करणार आहे.

बुधवारी (दि. ८) सकाळी लिंकरोडमार्गे चिंचवडगावात पालखी पोचणार आहे. या पालखी सोहळ्यासोबत महासाधू मोरया गोसावी यांची पालखी चिंचवडगावापर्यंत सहभागी होईल. सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत मोरया हॉस्पिटलसमोरील पटांगणात भाविकांना पालखीचे दर्शन घेता येईल. त्यानंतर पालखी दळवीनगर, आकुर्डी खंडोबा माळ चौकमार्गे जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने देहूकडे मार्गस्थ होईल.