पप्पू पुन्हा नापास झाला! मनसेची भाजप आमदार राम कदम यांची खिल्ली  

681

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा अहवाल प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केला आहे.  या अहवालात घाटकोपर पश्चिममधील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांना शेवटचे ३२ वे स्थान दिले आहे. यावरून  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची खिल्ली उडवली आहे. त्याचबरोबर त्यांचे अभिनंदन करणारे फलक घाटकोपरमध्ये त्यांच्या घरासमोर लावले आहेत.

आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही या फलकामध्ये संदर्भ देण्यात आला आहे. विभागात विकासकामे होत नाही, असे प्रजा फाउंडेशनच्या  अहवालातून समोर आले आहे. याकडे  राम कदम यांचे लक्ष वेधण्यासाठी फलकावर पप्पू कान्ट डान्स साला ! गोविंदा आला रे आला! पप्पू पुन्हा नापास झाला! असा मजकूर लिहिण्यात आला आहे.  मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी हे फलक लावले आहेत.

मागील चार अधिवेशनामधील  आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशनने मांडला आहे. या अहवालानुसार, काँग्रसचे मुंबईतील आमदार अमिन पटेल यांचा पहिला क्रमांक लागतो. तर भाजपचे आमदार राम कदम ३२व्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहेत.

मुंबईतील २४ हजार २९०  लोकांचे सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हंसा रिसर्चकडून हा सर्व्हे करण्यात येतो. २०१६ ते २०१७ दरम्यानच्या चार अधिवेशानात राम कदम यांची उपस्थिती सर्वाधिक कमी म्हणजे ४७ टक्के इतकी आहे. तसेच त्यांनी एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही.