‘पप्पा तुम्ही गुंड पाठवलेत’, जातीबाहेर लग्न केल्याने भाजपा आमदाराकडूनच मुलीच्या जीवाला धोका

96

लखनऊ, दि. ११ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन आपण जातीबाहेर लग्न केल्यानेच जीवाला धोका असल्याचं तिने सांगितलं आहे. यावेळी तिने पोलीस सुरक्षा दिली जावी अशी मागणीही केली आहे. २३ वर्षीय साक्षी मिश्रा ही बरेलीमधील भाजपा आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी आहे. व्हिडीओत साक्षी आपल्या वडिलांचा आणि भावाचा टोपण नाव ‘पप्पू भरतौल’ आणि ‘विकी भरतौल’ असा उल्लेख करताना ऐकू येत आहे.

“माननीय आमदार पप्पू भरतौलजी आणि विकी भरतौलजी…कृपया आम्हाला शांततेत जगू द्या. मी खरेच लग्न केले आहे. मी फॅशन म्हणून कुंकू लावलेले नाही”, असे साक्षी मिश्रा व्हिडीओत सांगताना दिसत आहे. साक्षी मिश्रा बोलत असताना एका व्यक्तीने मोबाइल हातात पकडलेला दिसत असून तो तिचा पती असावा असा अंदाज आहे.

साक्षी मिश्राने गेल्या गुरुवारी अजितेश कुमार याच्याशी लग्न केले आहे. “पप्पा…तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. मी खरंच आता दमली आहे. आमचा जीव धोक्यात असून, लपण्याचा कंटाळा आला आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणे थांबवा. मला आनंदी आणि मुक्त राहायचं आहे”. “या व्हिडीओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की, भविष्यात जर मला, अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, त्यांनी मदत करणं थांबवा कारण आमचा जीव धोक्यात आहे”, असेही साक्षीने व्हिडीओत सांगितले आहे.