पनवेल येथील न्यायालयात सापाचा न्यायाधीशांच्या हाताला चावा 

687

पनवेल, दि. ५ (पीसीबी) – पनवेल येथील न्यायालयात न्यायाधीशांना त्यांच्या दालनातच साप चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर न्यायालयात उपस्थितांची चांगलीच तारांबळ उडाली. न्यायाधीशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात केले. हा साप विषारी नव्हता. न्यायाधीशांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

मंगळवारी (दि.४) सकाळी ११.३० वाजता न्यायाधीश सी. पी. काशीद नेहमीप्रमाणे न्यायालयात आले होते. यावेळी अचानक सापाने त्यांच्या हाताला चावा घेतला. धामण जातीचा हा साप होता. साप चावल्यानंतर काशीद यांना तात्काळ सब-डिव्हिजनल रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना तिथून जुन्या पनवेलमधील गांधी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर सायंकाळी त्यांना रुग्णालयातून घरी नेण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर सर्पमित्र वकील दीपक ठाकूर यांनी या सापाला पकडून जंगलात सोडले. पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले. मात्र, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, असे चव्हाण यांनी सांगतिले.