पत्नीसोबत असभ्य वर्तन; विनोद कांबळीची अंकित तिवारीच्या भावासोबत मॉलमध्ये मारहाण

126

मुंबई, दि. २ (पीसीबी) – मुंबईतील इनऑर्बिट मॉलमध्ये रविवारी दुपारी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि गायक अंकित तिवारीचा भाऊ अंकुर तिवारी या दोघांमध्ये बाचाबाची झाली. अंकुरच्या वडिलांनी विनोद कांबळीच्या पत्नीसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप असून अंकुर तिवारींनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

रविवारी दुपारी विनोद कांबळी, त्याची पत्नी अँड्रिया हे दोघे इनऑर्बिट मॉलमध्ये गेले होते. तर अंकुर तिवारी, त्यांचे वडील, पत्नी आणि मुलांसह मॉलमध्ये गेले होते. विनोद कांबळी आणि अँड्रियाने अंकुर तिवारीच्या वडिलांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. अंकुर तिवारीचे वडील मला वारंवार स्पर्श करत होते, असे अँड्रियाचे म्हणणे आहे. यावरुन हा वाद टोकाला पोहोचला की अँड्रियाने अंकुर व त्यांच्या कुटुंबियांना चपलेने मारण्याचा प्रयत्न देखील केला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अंकुर तिवारी यांनी कांबळी दाम्पत्याने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. माझे वडील हे निवृत्त बँक कर्मचारी आहे. ते माझ्या मुलीला घेऊन गेम झोनमध्ये गेले होते. विनोद कांबळी आणि एका महिलेने मारहाण तसेच धक्काबुक्की केल्याचे त्यांनी मला सांगितले.

‘मी कांबळी दाम्पत्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला देखील धक्काबुक्की केली आणि मला शिवीगाळ केली. कांबळीच्या पत्नीने चपलेने मारण्याची धमकी दिली’, असेही त्यांनी सांगितले. ‘आमच्यातील वादाचे काही लोकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना देखील कांबळीने शिवीगाळ केली आणि त्यांना मोबाईलमधील शुटिंग डिलीट करण्यास भाग पाडले’, असे अंकुर यांनी सांगितले.