पत्नीसह तीन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या

296

अलाहाबाद, दि. २१ (पीसीबी) –  उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये पत्नीसोबत किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर तिन्ही मुलींना मारुन स्वत:ही गळफास घेऊन जीव दिला.

मनोज कुशवाह असे या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी श्वेता, प्रिती (वय ८ वर्ष), श्रेया ( वय ३ वर्ष) आणि शिवानी (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. पाच जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेनंतर घराबाहेर प्रचंड गर्दी झाली, त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबादच्या धूमनगंज परिसरातील पीपल गावमध्ये मनोज कुशवाह आपली पत्नी श्वेतासह राहत होता. या धक्कादायक घटनेआधी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यानंतर पतीने पत्नी श्वेतासह सगळ्या मुलींना मारुन आत्महत्या केली. हत्या आणि आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती वाद झाला होता, तो वाद चौघींची हत्या आणि आत्महत्यापर्यंत पोहोचला, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, पोलिसांचे पथक घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहे. तर परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर ही हत्या आणि आत्महत्या आहे की, बाहेरच्या कोणा व्यक्तीचा या घटनेत हात आहे, हे स्पष्ट होईल, अशी माहिती धूमनगंज पोलिसांनी दिली आहे.