पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने पतीवर गुन्हा

250

आळंदी, दि. ६ (पीसीबी) – रस्त्याने दुचाकीवरून जाताना पतीने निष्काळजीपणा करून दुचाकी चालवली. त्यामुळे दुचाकी समोरून जात असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकली. यामध्ये पत्नीचा हात ट्रॉलीच्या खाली आल्याने पत्नी गंभीर जखमी झाली. त्यातच पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवराज दगडू चव्हाण (रा. मरकळ, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. अर्चना जीवराज चव्हाण असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एच पी गाडेकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजता जीवराज आणि त्यांच्या पत्नी मयत अर्चना हे दोघेजण दुचाकीवरून गोलगाव ते मरकळ खिंड रोडने जात होते. पिंपळगाव तर्फे चाकण गावच्या हद्दीत आल्यानंतर जीवराज याने हयगयीने दुचाकी चालवली आणि दुचाकीची धडक समोरून जात असलेल्या उसाच्या ट्रॉलीला बसली. यामध्ये अर्चना रस्त्याच्या बाजूला पडल्या. मात्र त्यांचा हात ट्रॉलीच्या खाली आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या अर्चना यांचा त्यातच मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.