पत्नीचे डेबिट कार्ड पतीला वापरता येणार नाही- न्यायालय

70

बंगळुरू, दि. ७ (पीसीबी) – स्वत:चे डेबिट कार्ड पती-पत्नी, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींना वापरु देणाऱ्यांना दणका देणारा निर्णय बंगळुरुमधील न्यायालयाने दिला आहे. बँकेच्या नियमांनुसार एटीएम कार्डचे हस्तांतरण करता येत नाही. त्यामुळे एटीएम कार्डचा वापर संबंधित खातेधारकांशिवाय अन्य कुणीही करणे अयोग्य असल्याचे बँकेने म्हटले आहे. बँकेचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळली आहे.

बंगळुरुत राहणाऱ्या वंदना या नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रसूती रजेवर होत्या. वंदना यांनी त्यांच्या डेबिट कार्डचे पिन पती राजेश कुमार यांना दिले. त्यांनी घराजवळील एसबीआयचे एटीएम केंद्र गाठले आणि तिथून २५ हजार रुपये काढले. त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. पण प्रत्यक्षात मशिनमधून पैसेच बाहेर आले नाही. इथूनच या दाम्पत्याचा मनस्ताप सुरु झाला.

सुरुवातीला दाम्पत्याने कस्टमर केअरला फोन करुन याबाबतची माहिती दिली. तिथून त्यांना पैसे परत मिळतील, असे सांगण्यात आले. पण पैसे मिळत नसल्याने त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ‘कार्डाचे हस्तांतरण करता येत नाही. ते कार्ड एटीएम केंद्रात गेलेल्या व्यक्तीचे नव्हते. त्यामुळे पैसे परत मिळणार नाही’ असे बँकेने सांगितले. बँकेने दाम्पत्याला नियमावलीही दाखवली. गर्भवती असल्याने मला एटीएम केंद्रात जाणे शक्य नव्हते, असे वंदना यांनी बँकेला सांगितले. पण बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. शेवटी हे प्रकरण ऑक्टोबर २०१४ मध्ये ग्राहक न्यायालयात पोहोचले. बँकेने २५ हजार रुपये परत करावे. मी गर्भवती असल्याने बँक किंवा एटीएम केंद्रात जाऊ शकत नव्हते. म्हणूनच पतीला डेबिट कार्ड दिले, असे वंदना यांनी सांगितले.