पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा

85

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – पत्नीचे अनैतिक संबंध असलेल्या तरुणाला वारंवार समजावून सांगूनही त्याने पतीला धमकी दिली. या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार जुलै 2022 ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत टाकळी, ता. केज, बीड आणि शिंदेवस्ती मारुंजी येथे घडला.

अजिंक्य शिवाजी घुले (रा. मारुंजी, ता. मुळशी. मूळ रा. टाकळी, ता. केज. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश मीननाथ घुले (वय 24) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजिंक्य याचे गणेश यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत माहिती झाल्याने गणेश याने पत्नीसोबत गाव सोडले आणि मारुंजी येथे राहण्यास आला. आरोपी अजिंक्य देखील मारुंजी येथे रहाण्यास आला. त्याचे आणि गणेश यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध सुरूच होते. हा प्रकार गणेशच्या निदर्शनास आला असल्याने गणेश यांनी अजिंक्य याला जाब विचारला. त्यावरून अजिंक्य याने गणेश यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची तसेच गणेश यांच्या पत्नीला पळवून नेणार असल्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून गणेश यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.