पतंगाच्या मांज्याने त्याचा गळा चिरला, पण…

116

 नाशिक, दि. १३ (पीसीबी) – संक्रात म्हटलं की ठिकठिकाणी पंतगबाजी पाहायला मिळते. येवल्यामध्येही यंदा पतंगोत्सवला सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्षांपासून करोना निर्बंधांमुळे या पंतगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. मात्र यंदा करोना नियमांचं पालन करुन या पतंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. मात्र या उत्सवाला पहिल्याच दिवशी गालबोट लागले आहे. पतंगाच्या मांजामुळे एक तरुण जखमी झाला असून त्याला तब्बल २० टाके पडलेत.

येवल्यामधील कुमार मेघे हा युवक अंगणगावाकडे दुचाकीवरुन जात असताना मांजामुळे तो जखमी झाला. कटून आलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा या युवकाच्या गळ्याला अडकल्याने युवकाचा गळा कापला गेला. गळ्यातुन रक्तस्राव होत असल्याने स्थानिकांनी या युवकाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने या तरुणाचे प्राण वाचले. युवकाच्या गळ्याला २० टाके पडले आहेत.

युवकाची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र येवल्यात सर्रासपणे नायलॉनच्या मांजाचा वापर होत असल्याने अशाप्रकारचा अपघात पुन्हा होऊ शकतो. त्यामुळेच मांजाच्या वापरासंदर्भात स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होताना दिसतेय.