पगडी असो किंवा पागोटे मी काढणार नाही; विक्रम गोखलेंचा शरद पवारांना टोला

94

मुंबई, दि. २८ (पीसीबी)- पुणेरी पगडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून मध्यंतरी राजकारणात मोठे वादळ उठले होते. पवारांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. आता कलेच्या क्षेत्रातूनही पुणेरी पगडीवरून शरद पवारांना टोला लगावण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी यावरून नाव न घेता पवारांना चिमटा काढला. पगडी असो किंवा फेटा असो, हा मोठा सन्मान असतो. सन्मानाने दिलेली पगडी, फेटा किंवा पागोटे असो ती मी कधीच काढणार नाही, असे त्यांनी म्हटले.

पुण्यातील बालगंधर्व परिवाराकडून आयोजित जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी वापरण्यास सांगितले होते. यावरून राज्यभरात मोठे वादंग उठले होते. तोच धागा पकडत गोखले यांनी पवारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते विक्रम गोखले यांना गौरवण्यात आले. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.