पक्षाने संधी दिल्यास गडकरी, फडणवीस यांचा पराभव करू – नाना पटोले

73

नागपूर, दि. २ (पीसीबी) – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला जर नागपुरातून लढण्याची संधी दिली, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देण्यास मी तयार आहे, असे काँग्रेस नेते माजी खासदार नाना पटोले यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी सूचक विधान केल्याने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पटोले यांनी थेट गडकरी आणि फडणवीस यांना आव्हान दिले. जर पक्षाने मला उमेदवारी दिली, तर गडकरी, फडणवीस यांचा आपण सहज पराभव करू, असा विश्वास पटोलेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पक्षाने जबाबदारी दिली तर मी नागपूरमधून लढणार आणि आगामी काळात राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार, असेही पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस समोरासमोर कधी निवडून आले नाहीत. मतविभाजनाचा फायदा घेत ते निवडून आले आहेत. परंतु आता हे चालणार नाही. आता ते नापास होतील. मला लोकांची पसंती आहे हे मी दाखवून दिले आहे. देशात व राज्यामध्ये काँग्रेसच्याच नेतृत्वाखालील सरकार येणार असल्याचा विश्वास पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.