पंधरा लाखात मराठा समाज विकत घेतला काय?, सिन्नरमध्ये सहाने- बनकर यांच्यामध्ये  खडाजंगी

463

नाशिक, दि. ११ (पीसीबी) – पंधरा लाख दिले म्हणजे मराठा समाज विकत घेतला काय? पैशाची मिजाशी  आम्हाला दाखववू नका. या ठिकाणी सर्व समान आहेत. कुणी लहान मोठे नाही, अशा शब्दांत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजी सहाने यांना विशाल बनकर या तरूणाने खडे बोल सुनावले. त्यानंतर सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीच्या बैठकीत सहाने आणि बनकर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.

सिन्न्र येथे सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीची बैठक शुक्रवारी (दि. १० ) पार पडली. या बैठकीत  सहाने यांनी आपण दहा, पंधरा लाख दिले. मात्र, मला निमंत्रण न देता परस्पर निर्णय घेतले जातात, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच मोर्चा काढण्यात आला, तेव्हा मी पंधरा लाख रुपये दिले आहेत. मात्र मलाच निमंत्रण नव्हते, अशा अनेक तक्रारींचा पाढा सहाने यांनी वाचायला सुरूवात केली. यावर विशाल बनकर यांने पंधरा लाख दिले म्हणजे मराठा समाज विकत घेतला काय?, असा प्रतिप्रश्न केला.

यावर  दोघांमध्ये शाब्दीक चकमक होऊन हमरीतुमरी झाली. बैठकीतच खडाखडी झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी धुक्काबुक्की होती की काय अशी वेळ आली असताना  इतर पदाधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांना  समजावले.

या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी महापौर प्रकाश मते, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, समन्वयक चंद्रकांत बनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.  या प्रसंगावर उपस्थित सर्वांनी नाराजी व्यक्त केली. तर घडल्या प्रकाराची शहरभर चर्चा सुरू होती.