पंतप्रधान कार्यालय, लाल किल्ला हिटलिस्टवर; दिल्लीत सतर्कतेचा इशारा

148

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा या संघटनांनी १२ दहशतवादी दिल्लीत घुसवले आहेत. पंतप्रधान कार्यालय आणि लाल किल्ला या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे दिल्लीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

येत्या १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर- ए- तोयबा या दोन्ही संघटनांनी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. हा घातपात घडवून आणण्यासाठी जैशचे ७ तर तोयबाचे ५ अशा १२ दहशतवाद्यांनी दिल्लीत घुसघोरी केल्याचे सूत्रांकडून समजते. एटीएस पथक आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी नोएडामध्ये जमात-उल-मुजाहिद्दीनच्या २ संशयित दहशतवाद्यांना  ताब्यात घेतले होते. यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.

या १२ दहशतवाद्यांना पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयची फूस असल्याचे आयबी आणि रॉ या गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीसच नव्हे तर देशातील सर्व गुप्तचर यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहशतवादी पंतप्रधान कार्यालय आणि लाल किल्ल्यात बॉम्ब ठेवणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे विशेष सेलच्या माध्यमातून या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. लवकरच या दहशतवाद्यांना ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी   सांगितले.