पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोशी, बोऱ्हाडेवाडीत १२३ कोटी ७८ लाख खर्चून १२८८ घरे बांधणार

156

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ९ हजारहून अधिक घरे बांधण्याच्या कार्यवाहीला वेग दिला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातील १० ठिकाणी ही घरे बांधण्याचे नियोजन आहे. या योजनेचा पहिला नारळ मोशीतील बोऱ्हाडेवाडीत फोडला जाणार आहे. याठिकाणी १२३ कोटी ७८ लाखांचा खर्च करून एकूण १२८८ घरे उभारण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा अंतिम प्रस्ताव तयार केला असून, त्याला आता स्थायी समितीची मंजुरी घेतली जाणार आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे बांधण्याची पहिली वीट लवकरच रचण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत घर देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत स्वतःचे घर नसणाऱ्यांना कमी किंमतीत हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकल्यानंतर सर्वात आधी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि कार्यवाही सुरू केली. त्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिकेपासून ते राज्य सरकारपर्यंत जोरदार पाठपुरावा केला. या योजनेसाठी नागरिकांकडून अर्जही मागविण्यात आले. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून किती जणांना घरे हवी आहेत, हे निश्चित केले जाणार आहे.

महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार चऱ्होली येथे १४४२ (खर्च १५० कोटी ३२ लाख), रावेतमध्ये ९३४ (खर्च ९१ कोटी ६ लाख), डुडुळगावमध्ये ८९६, दिघीत ८४०, मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये १२८८ ( खर्च १३५ कोटी ९० लाख), वडमुखवाडीत १४००, चिखलीमध्ये १४००, पिंपरीत ३००, पिंपरीतच आणखी २०० आणि आकुर्डीमध्ये ५०० घरे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने नोव्हेंबर २०१७ मध्ये महापालिकेच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी देऊन ते केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविले होते. केंद्रानेही महापालिकेच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी दिली.

त्यानंतर महापालिकेने बोऱ्हाडेवाडी येथे १२८८ घरे बांधण्याच्या प्रकल्पासाठी ११० कोटी १३ लाख ७० हजार ७६२ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. या कामसाठी तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्टस प्रा. लि. या ठेकेदाराने १३४ कोटी ३६ लाख ७२ हजार ३३० रुपये, मे. करण बिल्डर्स या ठेकेदाराने १३९ कोटी ८७ लाख ४० हजार ८६८ रुपये आणि मे. बेंचमार्क रिअॅलिटी एलएलपी या ठेकेदाराने १४३ कोटी १७ लाख ८१ हजार ९९१ रुपये दर सादर केले आहेत. त्यातील मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्टस या ठेकेदाराची इतर दोन ठेकेदारापेक्षा कमी दराची, पण महापालिकेच्या निविदा दरापेक्षा २४ कोटी २३ लाख १ हजार ५६८ रुपये जादा दराची निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या ठेकेदाराला २३ मार्च २०१८ रोजी पत्र पाठवून दर कमी करण्याची विनंती केली.

त्यानंतर मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्टस या ठेकेदाराने १२५ कोटी ५५ लाख ६२ हजार ६६९ रुपये सुधारित दर सादर केले. परंतु, आयुक्त हर्डीकर यांनी पुन्हा २१ एप्रिल २०१८ रोजी ठेकेदाराला पत्र पाठवून आणखी दर कमी करण्याची विनंती केली. त्यामुळे ठेकेदाराने १२५ कोटी २० लाख ३८ हजार २८३ रुपये दरात हे काम करण्याची तयारी दर्शविली. आयुक्तांनी या ठेकेदाराला १० मे २०१८ रोजी तिसऱ्यांदा पत्र पाठवून आणखी दर कमी करण्यास सांगितले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने १२४ कोटी ९९ लाख २० हजार ५९५ रुपये दर सादर केले आहेत. आयुक्त हर्डीकर यांनी १९ जून २०१८ रोजी चौथ्यांदा पत्र पाठवून ठेकेदाराला आणखी दर कमी करण्याची विनंती केली. त्यानुसार या ठेकेदाराने १२३ कोटी ७८ लाख ३७ हजार ८९४ रुपयांत हे काम करण्याची अंतिम तयारी दर्शविली आहे.

राज्य सरकारच्या एसएसआरच्या दरानुसार तसेच जीएसटी, टेस्टिंग चार्जेस, आरसीसी डिझाईन, सिमेंट व स्टीलच्या दरातील फरक आणि रॉयल्टी शुल्कासह बोऱ्हाडेवाडी येथे १२८८ घरे बांधण्याच्या कामाची किंमत १२१ कोटी १९ लाख ३ हजार १६५ रुपये होत आहे. ठेकेदाराने १२३ कोटी ७८ लाख ३७ हजार ८९४ रुपये दर सादर केले आहेत. त्यामुळे या कामासाठी २ कोटी ५९ लाख ३४ हजार ७२८ रुपये म्हणजे २.१४ टक्के जादा खर्च येणार आहे. त्यानुसार मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्टस या ठेकेदाराची १२३ कोटी ७८ लाख ३७ हजार ८९४ रुपयांची निविदा स्वीकारण्यास आयुक्त हर्डीकर यांनी २२ जून २०१८ रोजी मान्यता दिली आहे. आता या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर बोऱ्हाडेवाडी येथे १२८८ घरे बांधण्याचा नारळ फोडण्यात येणार आहे.