पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा नाही; मात्र, भाजपला शह देण्यासाठी देश पिंजून काढणार – शरद पवार

558

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) प्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मला २०१९ मध्ये पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा नाही. मात्र आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. देश पिंजून काढून भाजपला शह देण्यासाठी विरोधकांना एकत्र आणून जनतेला आत्मविश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही पवार यांनी म्हटले आहे.  

२०१९च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, सध्याच्या राजकीय स्थितीला १९७५-७७ सारखी स्थिती नाही. त्यावेळी इंदिरा गांधींना पर्याय नसल्याचा भ्रम निर्माण झाला होता, तशीच स्थिती आता नरेंद्र मोदींबाबत झाली आहे. त्यावेळी इंदिराजींनी माध्यमांसह सरकार आणि सरकारी संस्थांवर नियंत्रण मिळवले होते. तशीच मोदींची स्थिती आहे.

पवार पुढे म्हणाले की, विरोधकांनी राष्ट्रीय युतीपेक्षा राज्यांतील युती करण्यावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर काँग्रेसने राज्यांमधील युतींसाठी तर्कसंगत दृष्टीकोन ठेवायला हवा. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विचारांमध्ये निश्चित सुधारणा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी  व्यक्त केली आहे.