पंढरपुरात मराठा समाजाच्या तीव्र भावना; आषाढी महापुजेला न येण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

69

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मराठा आरक्षणावरुन मराठा समाज मोर्चाने सोलापूरसह पंढरपुरात आंदोलन तीव्र केले आहे. आषाढी एकादशी निमित्त सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात सोमवारी (दि.२३ )दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विठ्ठलाच्या महापुजेला न येण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर  पंढरपुरातील परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी  गिरीश महाजन आणि सुभाष देशमुख यांनी आज (रविवारी) पंढरपूरला भेट देऊन  मराठा समाजातील लोकांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र, त्यांच्या भावना तीव्र असल्याने याचा काही लोक फायदा घेऊन जाणीवपूर्वक तणावाची परिस्थिती निर्माण करु शकतात. त्यामुळे आषाढी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी येथे हजेरी लावू नये, असे या दोघांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न येण्याचा निर्णय घेतल्याचे महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापुजेचा मान राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे सपत्नीक असतो. त्यामुळे परंपरेने दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा होत असते. मात्र, मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापुजा करु देणार नाही, असा इशारा आहे. दरम्यान, सोलापूरात मोर्चेकरांनी हिंसक आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात  आषाढी यात्रेमध्ये अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुजेला न येण्याचा निर्णय घेतल्याचे महाजन यांनी सांगितले.