पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपाची धावपळ; तावडे ‘रॉयलस्टोन’वर

188

महाराष्ट्र, दि.३ (पीसीबी) – स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर बरीच खळबळ उडाली होती. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपातून शिवसेनेत जाणार असल्याचही बोलल जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपाकडून धावपळ सुरू असल्याचेच चित्र आहे. सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर्व व्यवस्थित असल्याचं सांगितलं होत. पण, २४ तासातच भाजपाचे नेते विनोद तावडे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

परळी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या पक्षापासून बाजूला गेल्या होत्या. सार्वजनिक जीवनात वावरत असताना त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची नाराजी दिसून येत होती. पण, पराभवाबद्दल त्यांनी फार भाष्य केले नव्हते. त्यानंतर भाजपाचे सरकार चार दिवसात कोसळल्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून मार्ग ठरवणार असल्याचं म्हटले होते. विशषतः त्यांनी ट्विटर प्रोफाईलमधून भाजपाचा उल्लेखही काढून टाकला. शिवसेनेचे कौतूक करणारे ट्विट त्यांनी केले. त्यातून त्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू झाली. याविषयी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यावर काहीस गुढ उत्तर दिले होते.

पंकजा मुंडे यांच्या भाजपातून बाहेर पडण्याच्या चर्चांविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी खुलासाही केला होता. पण, या चर्चा अद्यापही थांबलेल्या नाहीत. एकनाथ खडसे यांच्या विधानानंतर आणि प्रकाश मेहता यांनी व्यक्त केलेल्या असंतोषानंतर भाजपात वेगळा गट तयार होत असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी दुपारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांना विधान परिषदेवर घ्यावे, असंही ते म्हणाले. लोणीकर यांच्या भेटीनंतर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे पंकजा यांची भेट घेण्यासाठी रॉयलस्टोन या शासकीय बंगल्यावर आले आहेत. तावडे यांच्याबरोबर माजी राज्यगृहमंत्री राम शिंदे हे बरोबर असल्याचे समजते.

 

 

WhatsAppShare