नोटाबंदीनंतर बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा

143

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – मोदी सरकारने  नोटाबंदी केल्यानंतर चलनातून बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या आहेत. बाद झालेल्या नोटांपैकी १५.३० लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत.  या नोटांची  तपासणी व नोंदणीचे काम  संपले आहे, अशी माहिती आरबीआयने प्रसिध्द केलेल्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे.  

भारतीय रिझर्व्ह बँकेचा २०१७ – १८ चा वार्षिक अहवाल आज (बुधवारी) प्रसिध्द करण्यात आला आहे. नोटबंदीनंतर आरबीआयकडे परत करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांची तपासणी व नोंदणी करण्याचे काम संपल्याचे आरबीआयने जाहीर केले.  बाद केलेल्या एकूण नोटांपैकी १५.३० लाख कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. काळा पैसा संपुष्टात यावा, दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद व्हावी, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ व्हावी व रोखीचे प्रमाम कमी व्हावे अशा बहुउद्देशीय कारणासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचे पाऊल उचलण्यात आले होते.

मार्च २०१८ अखेरीस भारतीय बाजारपेठेमध्ये १८ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य ३७.७ टक्क्यांनी वाढून १८.०४ लाख कोटी रुपये झाल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. तर केवळ नोटांच्या संख्येचा विचार केला तर ही वाढ दोन टक्क्यांची आहे. जास्त किमतीच्या म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यामुळे प्रत्यक्ष नोटांच्या संख्येतील वाढ २ टक्क्यांची आहे, परंतु मूल्यातील वाढ ३७.७ टक्क्यांची झाल्याचे स्पष्ट होत आहे. एकूण चलनात असलेल्या नोटांच्या मूल्यामध्ये म्हणजे १८ लाख कोटी रुपयांमध्ये ५०० व २००० रुपयांच्या नोटांचा वाटा तब्बल ७२.७ टक्के इतका आहे. तर नव्याने दाखल करण्यात आलेल्या २०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण २.१ टक्के आहे.