नोकरीवरुन काढून टाकल्याने कामगाराने घातल्या एचआरला गोळ्या

497

गुरुग्राम, दि. ८ (पीसीबी) – नोकरीवरुन काढून टाकल्याने एका तरुण कामगाराने एचआर विभागाच्या प्रमुखाला गोळ्या घातल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथे घडली.

बिनेश शर्मा असे गोळ्या लागून गंभीर जखमी झालेल्या एचआर विभागाच्या प्रमुखाचे नाव आहे. तर जोगिंदर असे गोळ्या घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील मानेसर परिसरात जपानमधील ख्यातनाम कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीमध्ये जोगिंदर हा तरुण कामावर होता. मात्र, कामाच्या ठिकाणी बेशिस्त वर्तन केल्याने त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. यामुळे संतापलेल्या जोगिंदरच्या एचआर विभागाचे प्रमुख बिनेश शर्मा यांना ‘तुला बघून घेईन’, अशी धमकी देखील दिली होती. मात्र, त्यावेळी जोगिंदरची धमकी कोणीही गांभीर्याने घेतले नाही.

मात्र, गुरुवारी जोगिंदरने बिनेश शर्मा यांच्यावर कार्यालयाबाहेरच गोळीबार केला. यात शर्मा यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी जोगिंदरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.